आपल्या आई-बापाच्या हक्कासाठी २७ सप्टेंबरच्या 'भारत बंद'मध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी व युवा-युवतींनी सहभागी व्हावे ! एसएफआय व डीवायएफआयचे आवाहन




बीड : शिव जागृती न्यूज
केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी तीन काळ्या कायद्यांच्या विरोधात गेली ११ महिन्यांपासून भारतातील शेतकरी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन करत आहेत. परंतु कार्पोरेट धार्जिणे बीजेपीचे केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असून शेतकऱ्यांच्या संयमाची परीक्षा घेत आहे. केंद्र सरकारने कामगार विरोधी चार कायदे करून कामगारांचे जगणे कठीण केले आहे. या कायद्यांमुळे कामगारांना कोणतीही पूर्व सूचना न देता कामावरून काढून टाकण्याचा अधिकार कंपन्यांना प्राप्त झाला आहे. त्यामुळे कामगारांच्या हातातले रोजगार धोक्यात आले आहे. म्हणून सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी संयुक्त किसान कामगार मोर्चा तर्फे 'भारत बंद'ची हाक देण्यात आलेली आहे. या 'भारत बंद'मध्ये विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि तरुण-तरुणींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) आणि भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डीवायएफआय) बीड जिल्हा कमिटीने केले आहे.
           
शेतकरी विरोधी तीन कळे कायदे लागू झाले तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळणार नाही. उत्पादन खर्च हा उत्पन्नापेक्षा जास्त झाल्याने शेतकरी कर्जबाजारी होऊन कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी हळूहळू स्वतःची जमीन विकेल. शासकीय कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद पडून कृषी बाजार समित्या जर मोठ्या कारखानदारांच्या हातात गेल्या तर काय होऊ शकते याचा अनुभव सोयाबीनच्या घसरलेल्या बाजार भावावरून आपण सर्वांनी घेतलेलाच आहे. म्हणून जनविरोधी व कॉर्पोरेटधार्जिणे तीन कृषी कायदे व चार श्रम संहिता रद्द करा. वीज दुरुस्ती विधेयक मागे घ्या. संपूर्ण उत्पादन खर्चाच्या दीडपट हमी भाव शेतकऱ्यांना मिळेल यासाठी केंद्रीय कायदा करा. संपूर्ण देश कॉर्पोरेट कंपन्यांना विकून टाकणारे खासगीकरणाची नीती बंद करा. डीझेल, पेट्रोल, गॅस व सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव निम्मे करा. महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेचे कामाचे दिवस आणि वेतन दुप्पट करा. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा मोठा विस्तार करून लसीकरण मोहिमेला गती द्या. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण - २०२० रद्द करा. लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि देशाच्या संविधानाचे रक्षण करा. या मागण्यांसाठी सोमवार दिनांक २७ सप्टेंबर २०२१ रोजी 'भारत बंद'चे आवाहन संयुक्त किसान कामगार मोर्चा तर्फे करण्यात आलेले आहे.

एसएफआय आणि डीवायएफआय बीड जिल्हा कमिटी जिल्ह्यातील विद्यार्थी-विद्यार्थीनी व तरुण-तरुणींना आवाहन करते की, आई-बापाची शेती, आपले शिक्षण आणि भविष्यातील रोजगार वाचवण्यासाठी, आपल्या हक्कासाठी 'भारत बंद'मध्ये मोठ्या संखेने सहभागी व्हावे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे डीवायएफआयचे राज्य उपाध्यक्ष ऍड. अजय बुरांडे, एसएफआयचे राज्य सचिव रोहिदास जाधव, जिल्हा अध्यक्ष सुहास झोडगे, जिल्हा सचिव लहू खारगे, डीवायएफआयचे जिल्हा सचिव मोहन जाधव, जिल्हा अध्यक्ष बालाजी कडभाने, तालुका अध्यक्ष सुहास जायभाये, तालुका सचिव कुंडलिक खेत्री, एसएफआयचे राज्य कमिटी सदस्य संतोष जाधव, अशोक शेरकर, तालुका सचिव अभिषेक शिंदे, तालुका अध्यक्ष विजय लोखंडे, शिवा चव्हाण, रामेश्वर आठवले आदींनी सांगितले.
 

टिप्पण्या