वंचित बहुजन आघाडीचे 24 जानेवारीपासून खुंटा उपट आंदोलन



 

पाटोदा : शिव जागृती न्यूज

विविध मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीतर्फे खुंटा उपट आंदोलन 24 जानेवारी रोजी आंदोलन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निवेदन वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

पाटोदा तालुक्यातील मौजे चिखली (ना) ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या गैरव्यवहाराची व अनियमतेची चौकशी करुन संबंधित ग्रामसेवक, सरपंच, शाखा अभियंता (पाणीपुरवठा) यांच्यावर गुन्हे दाखल करावे. ग्रामपंचायत सदस्य राहुल गौतम शिरोळे यांनी पाटोदा पंचायत समितीसमोर आंदोलन केल्यानंतर तीन वेळेस याची चौकशी विस्तार अधिकाऱ्यांनी केली. परंतु, त्यावर काहीही कार्यवाही झाली नाही. सदर बाबीची गंभीर दखल घेऊन आपण तात्काळ कार्यवाही कारावी. तसेच, पाटोदा पंचायत समितीस माहितीचे अधिकारात असलेली माहिती दिली जात नाही व विचारणा केल्यास तुम्ही औरंगाबादमध्ये आयुक्ताकडे अपील करा, असे सांगितले जाते.


बाळासाहेब गायकवाड यांनी  मागितलेली माहिती दिली गेली नाही व गटविकास अधिकारी पंचायत समिती पाटोदा यांनी माहिती न देणाऱ्या अधिकाऱ्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन लिखित स्वरुपात दिले. परंतु, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. पंचायत समितीमधील अनेक ग्रामपंचायतींनी दलित वस्तीमध्ये कामे न करताच बिले उचलली आहेत व निकृष्ट दर्जाची झाली आहेत. त्या सर्व कामांची उच्चस्तरीय चौकशी करावी. यावर कठोर कार्यवाही २३ जानेवारीपर्यंत न केल्यास कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीतर्फे तीव्र आंदोलन केले जाईल, असे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या निवेदनावर वंचित बहुजन आघाडी जिल्हा व तालुका पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

टिप्पण्या