जिल्हा परिषद पंचायत समितीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर



बीड: शिव जागृती न्यूज

राज्य निवडणूक आयोगाने जिल्‍हा परिषदेच्या प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार आता २३ मेपर्यंत जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या गट व गणांची विभागणी करून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्‍तांकडे प्रस्‍ताव सादर करण्यात येणार आहे. त्यावर हरकती, सूचना व सुनावणी होऊन अंतिम प्रभाग रचना २७ जून रोजी प्रसिद्ध केली जाणार असल्याचे पत्रक राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्घ केले आहे.

राज्यातील २५ जिल्‍हा परिषदा व २८४ पंचायत समित्यांची मुदत २१ मार्चला संपली आहे. या सर्व ठिकाणी सध्या प्रशासकाची नेमणूक केली आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा तिढा कायम राहिल्याने राज्य शासनाने निवडणुका न घेण्याचा निर्णय घेतला होता; मात्र राज्य शासन त्रिस्‍तरीय चाचणी पूर्ण करून स्‍थानिक संस्‍थांमधील ओबीसींचे प्रमाण निश्चित करत नाही आणि त्यानुसार आरक्षणाची तरतूद करत नाही, तोपर्यंत आगामी सर्व निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्याचे आदेश सर्वोच्‍च न्यायालयाने दिले होते. न्यायालयाचे आदेश आल्यानंतर निवडणूक आयोगाने जिल्‍हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यवाही करण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीसाठी प्रभाग रचनेचा कार्यक्रम आज आयोगाने जाहीर केला आहे.


प्रारूप प्रभाग रचनेचा प्रस्‍ताव विभागीय आयुक्‍तांकडे २३ मे रोजी जिल्‍हाधिकाऱ्यांमार्फत विभागीय आयुक्‍तांकडे सादर केली जाणार आहे. या प्रारूप प्रभाग रचनेच्या प्रस्‍तावास विभागीय आयुक्‍तांकडून ३१ मेपर्यंत मान्यता देण्यात येणार आहे. जिल्‍हाधिकाऱ्यांकडून दोन जून रोजी प्रारूप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसि‍द्ध करण्यात येणार आहे. २ ते ८ जून या काळात जाहीर केलेल्या प्रभार रचनेवर हकरती, सूचना व सुनावणी घेण्याची जबाबदारी जिल्‍हाधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. प्राप्‍त झालेल्या हरकती व सूचनांवर सुनावणी घेऊन निवडणूक विभाग, निर्वाचक गण रचना अंतिम करण्याचे काम विभागीय आयुक्‍तांकडून २२ जूनपर्यंत केले जाणार आहे. या सर्व प्रक्रियेनंतर अंतिम केलेली प्रभाग रचना जिल्‍हाधिकारी यांच्याकडून २७ जून रोजी राजपत्रात प्रसि‍द्ध केली जाणार आहे.


असा आहे प्रभाग रचना कार्यक्रम


दि. २३ मेपर्यंत- प्रारूप प्रभाग रचना

दि. ३१ मेपर्यंत- प्रारूप प्रभाग रचना प्रस्‍तावास मान्यता

दि. २ जून – प्रारूप प्रभाग रचना प्रसि‍द्ध

दि. २ ते ८ जून – हरकती, सूचना व सुनावणी

दि. २२ जूनपर्यंत – हरकतीवर सुनावणी


दि. २७ जून – अंतिम प्रभाग रचना प्रसिद्ध .

टिप्पण्या