सोनदरा गुरुकुलाशी नाते घट्ट करणारा वार्षिक पालक मेळावा संपन्न


पाटोदा : शिव जागृती न्यूज 

पाटोदा तालुक्यातील डोमरी येथे शनिवार, रविवार दि. ४, ५ जानेवारी २०२५ रोजी दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान सोनदरा गुरुकुल, डोमरी या मराठवाड्यातील शैक्षणिक संस्थेचा वार्षिक महोत्सवी कार्यक्रम ‘पालक मेळावा’ संपन्न झाला. 

यावर्षी गुरुकुलातील २४० विद्यार्थ्यांचे सुमारे ७०० पालक व कुटुंबीय गुरुकुलात या कार्यक्रमासाठी आले होते. 

४ जानेवारी रोजी गुरुकुलाच्या ‘कदंबवन’ या शैक्षणिक परिसरात विद्यार्थ्यांनी पालकांसमोर आपापल्या वर्गात बौद्धिक प्रात्यक्षिके होती. यात प्रार्थना, प्रश्नोत्तरे, कविता, गटसादरीकरण अशा विविध प्रकारे विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. 

गुरुकुलातील ‘नालंदा’ या निवासी परिसरात औपचारिक उद्घाटन सोहळा झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वासुदेव सोळंके (अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हापरिषद) हे उपस्थित होते. यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वांसमोर शारीरिक प्रात्यक्षिके सादर केली. यात सायकल कसरती, जलतरण प्रात्यक्षिके, लेझिम, दंड, योग यांची प्रात्यक्षिके, गतीमान व्यायाम प्रकारांची प्रात्यक्षिके, कबड्डी, खोखो, व्हॉलिबॉल या खेळांच्या प्रात्यक्षिकांची वेगवान मिश्र झलक, ‘बरचीनृत्य’ यांचा समावेश होता. यानंतर योग प्रशिक्षक विनायक वझे यांच्या हस्ते वर्षभरात विविध क्रिडा स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले.  मंडपामध्ये गुरुकुल बालवाडीतील चिमुकल्यांपासून ते १०वी इयत्तेतील मोठ्या विद्यार्थ्यांनी नृत्य, नाटके, एकपात्री अभिनय इ. विविध कार्यक्रमांतून आपल्या कलागुणांचे दर्शन सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये घडवले. 

५ जानेवारी रोजी सकाळी साडेसहा वाजता सर्व पालकांसाठी उपासनासत्र झाले. यात सामुहिक ध्यान झाल्यावर गुरुकुलाचे सचीव अश्विनदादा भोंडवे, विश्वस्त हेमाताई होनवाड, कार्तिकीताई भोंडवे पाटील यांनी पालकांशी प्रबोधनात्मक संवाद साधला. यानंतर गुरुकुल विश्वस्त, शिक्षक व पालकांचे प्रकट मनमोकळ्या संवादाचे ‘मुक्त चिंतन’ सत्र झाले. नंतर प्रदर्शनी पाहण्यासाठी वेळ होता. ५वी व ६वीने कोल्हापूर, ७वीने पुणे, ८वीने कोकण, ९वीने मुंबई व १०वीने बंगळुरू या शहरातील विविध ठिकाणे, इमारती, संस्था यांचे व तेथील अनुभवातू मिळालेल्या शिक्षणाचे प्रदर्शन फलक, तक्ते, चित्रे, देखावे स्वरुपात मांडले होते.

साडेदहा वाजता सुरु झालेल्या मुख्य कार्यक्रमात प्रमुख पाहुणे आ. राम भोगले यांनी आपल्या भाषणात गुरुकुल व्यवस्थापन आणि विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्य वक्त्या आ. सुजाताताई यांनी आपल्या भाषणात पालकांचे प्रबोधन केले.

सर्व कार्यक्रमांचे सूत्रसंचालन विद्यार्थ्यांनीच उत्तम प्रकारे केले. सर्व पालकांनी वेळेवर सत्रांना उपस्थित राहून व प्रसंगी वाढपासारखी मदत करून आपले गुरुकुलाशी असलेले जवळचे नाते जपले. 

अशारितीने दरवर्षीप्रमाणे दीनदयाळ नवरचना प्रतिष्ठान सोनदरा गुरुकुल डोमरीचा वार्षिक महोत्सवी पालकमेळावा सुविहितपणे संपन्न झाला..

टिप्पण्या