बीड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ


 शिव जागृती न्यूज 

बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून पावसाचा धुमाकूळ; आष्टी तालुक्यातील अनेक गावात पुराचे पाणी, 30 गावांचा संपर्क तुटला आहे.गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या 32 गावात पाणी शिरलं आहे, तर वडवणी आणि डोंगर पट्याचा संपर्क तुटला आहे.

बीड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सुरू असलेल्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. बीड, गेवराई, पाटोदा, शिरूर आणि आष्टी तालुक्याला मध्यरात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने झोडपून काढले आहे. आष्टी तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला असून देवळाली गावात मोठ्या प्रमाणात पाणी शिरल आहे. परिणामी परिसरातील सुलेमान देवळा, दौलावडगाव सह परिसरातील 30 गावांचा संपर्क तुटलाय..

सततच्या पावसानं नदी नाले दुथडी भरून वाहतायत.. तर अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडलीय. बीड अहिल्यानगर महामार्गावरील धानोरा येथील कांबळी नदीला पूर आल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान ही परिस्थिती पाहता नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन तहसील प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

आष्टी तालुक्यातील धामणगाव, दौलावडगाव, धानोरा, नांदूर, घाटा पिंप्री, देवळाली, देविनिमगाव, कुंठेफळ, केळ,पिंपळगाव, हरेवाडी, मराठवाडी, देऊळगाव घाट, बांदखेल, खिळद, गहुखेल, सुलेमान देवळा,दादेगांव, कारखेल खुर्द, आरणवीहिरा, तागडखेल, म्हसोबाचीवाडी, बाळेवाडी, कुंभेफळ, पुंडी इत्यादी ठिकाणी नदीचे पाणी पुलावर वाहत असल्याने इतर गावाचा संपर्क तुटला आहे. वरील ठिकाणी काही गावांमध्ये नदीचे पाणी शिरले आहे. अजूनही खूप जोरात पाऊस चालु आहे.अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली जाऊन इतर गावांचा सपंर्क तुटण्याची शक्यता आहे. कोणीही घराबाहेर पडू नका. नदीची पातळी वाढत असल्याने नदीकाठच्या गावांनी व राहिवासी लोकांनी सतर्क राहून तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. मदतीसाठी अंभोरा पोलीस स्टेशन येथे सपंर्क करावा.

टिप्पण्या