पाटोदा नगर पंचायतीचा निवडणुकीची तयारी सुरू झाली असून, त्यादृष्टीने प्रभाग निहाय आरक्षण सोमवारी काढण्यात आले. यामध्ये अनेकांचे प्रभाग आरक्षित झाल्याने त्यांना दुसर्या प्रभागातून निवडणूक लढण्याची वेळ आली आहे. तर यात या पूर्वी काढण्यात आलेल्या आरक्षणानुसार अनेक इच्छुकांनी केलेल्या मतदारावरील खर्च नवीन आरक्षणामुळे वाया गेला आहे. अनेकांनी इतके दिवस केलेली तयारीही वाया जाणार का, असा प्रश्न आता अनेकांसमोर उपस्थित झाला आहे.
गुलाबी थंडीत वातावरण तापण्यास सुरूवात झाली असून, आरक्षणानंतर इच्छुकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.
या पुर्वी वर्षभरापूर्वी नोव्हेंबर २०२० ला नगरपंचायतीसाठी आरक्षण जाहीर झाले होते. मात्र, कोरोणामुळे निवडणुका लांबणीवर गेल्याने व आरक्षणात बदल झाल्याने आता पुन्हा आरक्षण काढण्यात आले. एका इतर मागासवर्गीय जागेचे आरक्षण रद्द झाल्याने नव्याने आरक्षण काढण्यात आले. त्यामुळे काही प्रभागातील आरक्षणात बदल झाला आहे. त्यामुळे इच्छूकांमध्ये कुछ खुशी कुछ गम अशी अवस्था निर्माण झाली आहे. तीच असस्था काही प्रमाणात राजकीय पक्षांची झाली आहे. कारण आपल्या मनातील उमेद्वार आता राजकिय नेत्यांना उभा करण्यात अडचणी येणार आहेत. अनेक इच्छुक उमेदवारांनी दिवाळी भेट वस्तू, मिठाईचे वाटप केले होते. तसेच काहींनी तर मतदारांसाठी सहलीही घडविल्या होत्या. त्यामुळे अनेक इच्छूकांचा केलेला खर्च वाया गेला आहे. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला आहे. काहीजण सुखावले आहेत.
नगरपंचायतीवर नव्या आरक्षणाप्रमाणे आता महिलाराज येणार आहे तर आरक्षणामुळे अनेकांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले तर काहींच्या आशा पल्लवित झाल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये ‘कहीं खुशी कहीं गम’ अशी स्थिती झाली. अनेक ठिकाणी विद्यमान नगरसेवकाचे आरक्षण निघाले नाही, पण त्यांच्या पत्नीला ते उभे करू शकतात. काही विद्यमान नगरसेवकांना आपला प्रभाग सोडून दुसरीकडे उभे राहावे लागेल. काही ठिकाणी आधी खुल्या प्रवर्गातून लढलेल्या उमेदवारांना आता त्यांचाच प्रभाग राखीव मिळाला आहे. काही विद्यमान नगरसेवकांना मात्र त्यांचा प्रभाग राखीव मिळाला नाही. पाहिजे त्या प्रभागात आरक्षण न मिळाल्याने काही विद्यमान नगरसेवकांची मात्र गोची झाली आहे. आता प्रत्येक जण आपापल्या प्रभागाची मतदार यादी घेऊन आपल्याला सोईचा प्रभाग कोणता याचे गणित मांडण्यात मग्न झालेले दिसून येतात.
इच्छेप्रमाणे आरक्षण न निघाल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे. तर नवीन उमेदवार त्या वॉर्डामध्ये कोण राहिल याचा शोध राजकीय पक्षाकडून घेतला जात आहे.
पाटोदा नगर पंचायत मध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचे आ. सुरेश धस गटाचे वर्चस्व राहिले आहे. होणाऱ्या निवडणुकीत सध्या तरी महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी लढत होणार असली तरीही ऐन वेळी तिसऱ्या आघाडीचा उदय होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यामधून होताना दिसत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा