म. गांधी जयंतीदिनी सांगलीत शिक्षण संस्था महामंडळाचे भव्य महाधिवेशन खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली होणार.- रावसाहेब पाटील स्वागताध्यक्ष


 


सांगली दि. २४ : शिव जागृती न्यूज

पन्नास वर्षापूर्वी स्व. वसंतदादा पाटील यांनी शिक्षण संस्थांच्या समस्या सोडविण्यासाठी सांगलीत स्थापन केलेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे राज्यस्तरीय भव्य महाधिवेशन सांगलीत म. गांधी यांच्या जयंतीदिनी म्हणजे २ ऑक्टोबर रोजी खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या अध्यक्षतेखाली भरणार आहे. या अधिवेशनात राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना. दिपक केसरकर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री ना. चंद्रकांतदादा पाटील, कामगार मंत्री ना. सुरेश खाडे व पाचही जिल्ह्य़ातील आमदार व मान्यवरांना निमंत्रित करण्यात येणार असल्याचे महामंडळाचे कोषाध्यक्ष तथा अधिवेशनाचे स्वागताध्यक्ष रावसाहेब पाटील यांनी सांगितले.या अधिवेशनासाठी जाहिरात.. निधी संकलन आणि अधिवेशनातील संस्थांची उपस्थिती या बाबतीत अध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे, कार्याध्यक्ष विजय नवल पाटील नाना यांनी पत्राद्वारे आवाहन केले असून उपाध्यक्ष अशोकराव थोरात, वसंतराव घुईखेडकर व आबेदा इनामदार आणि सरकार्यवाह माजी आमदार विजय गव्हाणे व रविंद्र फडणवीस व अन्य पदाधिकारी व राज्य कार्यकारिणीची टीम राज्यातील सर्व विभागात सक्रिय झाली आहे. हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचे असून खासगी शिक्षण संस्था, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर अधिवेशनात ठराव संमत करुन मंत्री व लोकप्रतिनिधी यांच्या समोर कैफियत मांडली जाणार आहे.त्यामुळे राज्यातील शिक्षण संस्था चालकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही रावसाहेब पाटील यांनी केले आहे. 


आज रावसाहेब पाटील यांच्या दालनात अधिवेशन तयारीबाबत कोल्हापूर विभागीय आढावा  बैठक संपन्न झाली. अधिवेशनात राज्यातील सुमारे चार ते पाच हजार संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार असून या अधिवेशनात सुवर्ण शिक्षण साधना ही स्मरणिका प्रकाशित करण्यात येणार असून जाहिरात व निधी संग्रहाचे नियोजन करण्यात आले. 

प्रारंभी कोल्हापूर विभागीय सेक्रेटरी प्रा. एन.डी.बिरनाळे यांनी स्वागत करुन मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले. रावसाहेब पाटील यांनी पुणे येथील बैठकीची माहिती दिली. तसेच अधिवेशन कामकाजासाठी गठीत करण्यात येणाऱ्या विविध समित्यांची माहिती सांगितली. सदरील अधिवेशनासाठी प्रत्येक जिल्ह्यात बैठक घेऊन निययोजन करण्यात येईल असे ठरले असल्याची माहिती औरंगाबाद विभागीय सहकार्यवाहक तथा बीड जिल्हा अध्यक्ष दिपक  घुमरे यांनी दिली आहे

टिप्पण्या