★अॅग्रिस्टॅक प्रकल्प सुरु असूनही फार्मर आयडी सहा ते आठ महिन्यांपासून प्रलंबित
पाटोदा | शिव जागृती न्यूज
शासनाने शेतकऱ्यांना डिजिटल लाभ देण्यासाठी ‘अॅग्रिस्टॅक’ प्रकल्प सुरु केला असला, तरी महसूल प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे पाटोदा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना अजूनही त्याचा फायदा झालेला नाही. तब्बल सहा ते आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांची ‘फार्मर आयडी’ प्रलंबित असून, त्यामुळे विविध कृषी योजनांचे अनुदान, खरीप व रब्बी हंगामातील बियाणे व खत यांचे लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाहीत.
शेतकऱ्यांनी महसूल कार्यालयात वारंवार धाव घेतली, मात्र संबंधित कर्मचाऱ्यांकडून “सर्व्हर डाऊन आहे”, “साईट चालत नाही”, “ते साहेब नाहीत”, “माझ्याकडं नाहीं, दुसऱ्याकडे आहे” अशा अनेक सबबी सांगून वेळ मारून नेली जाते. या कारभारामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. “सरकारने अॅग्रिस्टॅक प्रकल्प सुरु केला म्हणे, पण आमच्या आयडीला मंजुरी मिळत नाही. मग या प्रकल्पाचा फायदा कोणाला?” असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जात आहे.याबाबत शेतकरी नेते भाई विष्णुपंत घोलप यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या फार्मर आयडी प्रलंबित प्रकरणांचा निकाल लावला नाही, तर तीव्र आंदोलन करण्यात येईल.शासनाने तातडीने तपासणी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अन्यथा परिस्थिती आणखी बिघडू शकते.
★संबंधित कर्मचाऱ्यांची उडवाउडवीची उत्तरे
महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांचे काहीच देणंघेणं नसल्यासारखं दिसत आहे. कितीही शेतकऱ्यांबाबत माहिती विचारली तरी ते नेहमीच उडवा उडवी चे उत्तर देतात आणि शेतकरी विषय हा त्यांच्यासाठी किरकोळ आहे असं दाखवतात.. अधिकाऱ्यांचं असं वागणं बरं नव्हे..


टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा