पाटोदा : शिव जागृती न्यूज
सध्याचे युग हे प्रचंड स्पर्धेचे बनले आहे. शिक्षण, नोकरी, शेती, उद्योग अशा सर्वच क्षेत्रात आज चुरशीची स्पर्धा निर्माण झाली आहे. शिक्षणाचा खर्च झपाट्याने वाढत असून नोकरीच्या संधी मर्यादित झाल्या आहेत. त्यातच निसर्गाचा असमतोल वाढल्यामुळे शेतीसारखा पारंपरिक व्यवसायही दिवसेंदिवस जोखमीचा होत चालला आहे. अशा परिस्थितीत युवकांनी केवळ नोकरीच्या किंवा शेतीच्या आशेवर राहता कामा नये, तर स्वतःचा व्यवसाय उभा करून आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करावी, असे स्पष्ट प्रतिपादन युवा नेते सागर धस यांनी केले.
पाटोदा शहरात नुकताच एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सामाजिक, राजकीय आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभली.
या प्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी संस्थानचे प्रमुख ह.भ.प. सतीश महाराज उरणकर, युवा नेते सागर धस, नगराध्यक्ष राजूभैय्या जाधव शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस विष्णुपंत घोलप, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष आनंद जाधव, माजी जिल्हा परिषद सभापती महेंद्र गर्जे, सोमीनाथ कोल्हे आदी मान्यवर उपस्थित होते.
या वेळी बोलताना सागर धस म्हणाले,“आजच्या काळात यशस्वी होण्यासाठी धाडस, दृष्टीकोन आणि मेहनत या तिन्ही गोष्टींचा संगम आवश्यक आहे. कोणताही व्यवसाय प्रामाणिकपणे, इमानदारीने आणि सचोटीने केल्यास नक्कीच यश मिळते. तरुण पिढीने केवळ सरकारी किंवा खाजगी नोकरीकडे न पाहता स्वतःचे काहीतरी निर्माण करण्याची जिद्द बाळगली पाहिजे. आर्थिक समतोल राखायचा असेल तर उत्पन्नाचे विविध स्त्रोत असणे गरजेचे आहे.”
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुशील ढोले यांनी केले, मान्यवरांचे स्वागत अनिल ढोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन अक्षय जाधव यांनी केले. या प्रसंगी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा