नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प ओळख कार्यक्रम संपन्न
पाटोदा: शिव जागृती न्यूज
तालुका कृषि अधिकारी कार्यालय पाटोदा यांच्या पुढाकाराने जागतिक मृदा दिनाचे औचित्य साधत तळे पिंपळगाव येथे दि.5 रोजी शेतकरी बांधवांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. मृदा चाचणी जनजागृती, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाची ओळख व नैसर्गिक आपत्ती eKYC कॅम्प या महत्त्वपूर्ण कार्यक्रमांमुळे गावातील शेतकऱ्यांना ज्ञान व सुविधा दोन्हींचा लाभ मिळाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान तालुका कृषि अधिकारी श्री.ओंकार शेळके यांनी भूषवले. तसेच मंडळ कृषि अधिकारी श्री. नागरगोजे, उप कृषि अधिकारी मिसाळ मॅडम, सहाय्यक कृषि अधिकारी श्री. शेवाळे यांनी मार्गदर्शन केले.
जागतिक मृदा दिनानिमित्त मृदा आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करताना अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना वेळोवेळी मृदा चाचणी करून घेण्याचे आवाहन केले. मातीतील पोषक द्रव्यांचे प्रमाण, योग्य खते, पिकांचे संतुलित नियोजन आणि उत्पादनवाढीशी निगडीत विविध बाबींवर शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमात नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (PoCRA) अंतर्गत शाश्वत शेती, पाण्याचे संवर्धन, हवामान बदलाशी जुळवून घेण्याचे तंत्र आणि शेतकरी समूहांच्या बळकटीकरणाबाबत माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनी प्रकल्पातील विविध लाभांविषयी उत्सुकता दर्शवली.
त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती eKYC कॅम्पद्वारे शेतकऱ्यांची नोंदणी व माहिती अद्ययावत करण्यात आली. भविष्यात आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत व शासनाच्या योजनांचा लाभ तत्काळ देण्यासाठी ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
या उपक्रमामुळे तळे पिंपळगाव परिसरातील शेतकऱ्यांमध्ये मृदा आरोग्याविषयी जागरूकता वाढून आधुनिक व शाश्वत शेती पद्धतींकडे वाटचाल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमाला कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी श्री रामेश्वर पवळ, सुधीर राऊत, योगेश जाधव,आत्माचे बाळासाहेब तांबडे, ऑपरेटर माऊली वीर,सरपंच शशिकांत चौरे, यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ,शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा